नवी दिल्ली - चीनबरोबर लडाखमध्ये सीमावाद सुरु असतानाचा हवाई दलाने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चीनने आक्रमक धोरण स्वीकारले असल्याने हवाई दलाने चीनच्या आगळीकीला उत्तर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सीमेजवळील सर्व महत्त्वाच्या लष्करी तळावर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली असून या महिन्याच्या शेवटी मिळणारी राफेल लढाऊ विमानेही या भागत तैनात करण्यासाठी हाचलाची सुरु झाल्या आहेत.
22 जुलैला हवाई दलाची बैठक होणार असून सुरक्षेसंबधीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. हवाई दल प्रमुख आर.के.एस भदौरिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. देशातील सात विभागीय हवाई दल प्रमुख बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या तैनाती बद्दल चर्चा करण्यात येणार आहे.
सध्या सीमेवर मिराज 2000, सुखोई-30, मिग-29 ही लढाऊ विमाने सीमेवरील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. त्यात राफेल विमानांचीही लवकर भर पडणार आहे. दिवसा आणि रात्रीच्या अंधारात कोणतेही ऑपरेशन पार पाडण्याची क्षमता हवाई दलात आहे. यासोबतच अॅडव्हान्सड अपाचे अटॅक हेलिकॉप्टर चीनबरोबरच्या सीमेजवळ तैनात करण्यात आले आहे. या महिन्याच्या शेवटी राफेल विमाने भारताला फ्रान्सकडून मिळणार आहेत. त्यांची तैनाती आणि इतर ऑपरेशनल बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.