चेन्नई - कोरोनाशी लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार काहीच करत नसल्याची वारंवार टीका केली जात होती. त्यामुळे तामिळनाडू सरकारने यावर उपाय करत, सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयानेही जवळच्या हॉटेलांमध्ये, तसेच आमदार निवासामध्ये आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्येदेखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
राजीव गांधी सरकारी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी सांगितले, की सरकार सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देत असणाऱ्या सुविधा या पुरेशा आहेत. मात्र, या हॉटेलांमध्ये राहत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मात्र हॉटेलांमध्ये पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे म्हटले आहे. एकाच रुममध्ये बरेच लोक राहत असून, कित्येकांना कॉमन वॉशरूम शेअर करायला लागत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासोबतच, एका डॉक्टरांनी असेही म्हटले की त्यांना एका शिफ्टसाठी एकच पीपीई किट मिळत आहे. त्यामुळे पीपीई किट हा अजूनही डॉक्टरांसाठी मोठा प्रश्न ठरत आहे.
तामिळनाडू सरकारने डॉक्टरांना सुरक्षा साधनांसोबतच, चांगली राहण्याची व्यवस्थाही पुरवण्याची तामिळनाडू सरकारी डॉक्टर असोसिएशनने मागणी केली आहे. यासोबतच या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्थाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.