कोलकाता - केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून चांगलीच जुंपली आहे. केंद्रीय गृह सचिव दिल्लीतील राजकीय नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. भारत- बांगलादेश सीमेवरून अत्यावश्यक मालाची ने-आण करण्यास पश्चिम बंगाल सरकार परवानगी देत नसल्याचा आरोप केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी केला होता. त्याला तृणमूल काँग्रेसने उत्तर दिले आहे.
राज्यात कोरोना चाचण्या कमी होण्यासही पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. कोरोना चाचण्या करण्यासाठी कमी तसेच सदोष किट पाठविल्यामुळेच राज्यात चाचण्या कमी झाल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.
केंद्र सरकार राजकीय खेळी खेळत असून त्यासाठी नोकरशाहीचा वापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार सौगता रॉय यांनी आरोप केला आहे. नाहीतर भारत- बांगलादेश सीमेवर मालाची ने-आण बंगाल सरकारने थांबवली नाही हे दिल्लीतील अधिकाऱ्यांना समजले असते. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे सरकारला नाईलाजास्तव वाहतूक बंद करावी लागली. मात्र, आम्ही पोलीस बळाचा वापर करायचे टाळून स्थानिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे रॉय म्हणाले.
भल्ला यांनी राज्य सरकारला लिहलेली पत्रेही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये तथ्य आणि आकडेवारीचा अभाव आहे, असे रॉय म्हणाले.
दोन्ही देशादरम्यान असलेल्या पेट्रापोल पोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही स्थानिक नागिरकांशी चर्चा सुरू केली आहे. भारत बांगलादेश व्यापार सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. २ मे पासून दोन्ही देशांतील चर्चा स्थानिक नागरिकांच्या आंदोलनामुळे बंद आहे. ट्रक चालक आणि मजूरांमुळे कोरोनाचा प्रसार होईल, अशी भीती सीमेवर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये पसरली आहे. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.