तिरुपती - लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तिरुमाला येथील व्यंकटेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आता हे मंदिर येत्या 8 जूनपासून दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. यासाठी पहिले तीन दिवस ट्रायल घेतले जाणार आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश आहे.
मंदिर देवस्थानाने जाहीर केले आहे, की 8 आणि 9 जून रोजी केवळ तेथील कर्मचाऱ्यांना दर्शन घेण्यासाठी परवानगी आहे. तर, 10 जून रोजी स्थानिक भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. हे मंदिर इतर भाविकांसाठी 11 जूनपासून सुरु होणार आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मोजक्याच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
टीटीडी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी एका न्यूज कॉन्फरन्समध्ये सांगितले की, सुरुवातीला दररोज फक्त 6 हजार ते 7 हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे. दर तासाला सुमारे 500 भाविकांना दर्शन घेता येईल. सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसातपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहाणार आहे. मंदिरात 65 वर्षांवरील व्यक्ती 10 वर्षांखालील मुले आणि कंटेनमेंट झोनमधून आलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही.
याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणे तसेच 6 फूटाचे अंतर ठेवणे बंधनकारक असणार आहे. सोबतच मंदिराचा परीसर सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार सॅनिटाइझ केला जाणार आहे. येथे येणाऱ्या भाविकांना सॅनिटायझरही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.