नवी दिल्ली - सध्या युवकांमध्ये टिकटॉकची क्रेझ मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. टिकटॉक व्हिडीओसाठी अनेकजण व्यक्ती जीवघेणे प्रयोग करत असतात. दिल्लीतील एका व्यक्तीने असाच काही प्रयोग केला आहे. आपल्या वाढदिनी त्याने हवेत गोळीबार करून त्याचा टिकटॉक व्हिडीओ बनवला आहे. हवेत गोळीबार केल्या प्रकरणी त्याला चांदनी महल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फैजान (वय ३२ वर्षे) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त मनदीप सिंह रंधावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्टला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये चांदनी महलच्या सुईवालां येथे राहणाऱ्या फैजानने टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी गोळीबार केला होता. त्याने प्रथम हा व्हिडीओ टिकटॉकवर पोस्ट केला त्यानंतर व्हाट्सअॅप, फेसबुक त्यानंतर तो अन्य समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओबाबत चौकशी केल्यानंतर हा व्हिडीओ चांदनी महल येथील सुईंवाला भागातील असल्याचे समोर आले.
वाढदिनी तयार केला होता फैजानने व्हिडीओ
पोलीस उपायुक्तानुसार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षेच्या दृष्टीने सर्व योजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, ठाणे अंमलदार विनोदकुमार सिंह यांना या व्हिडीओची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक फैजानचा शोध घेऊ लागले. पोलिसांच्या तपासणीदरम्यान हा व्हिडीओ १० ऑगस्टच्या सायंकाळी केल्याचे निष्पन्न झाले. त्या दिवशी फैजानचा ३२ वा वाढदिवस होता. व्हिडीओ व्हायरल होताच त्याने घर सोडून पळ काढला होता.
चांदनी महल भागातून घेतले ताब्यात
दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, फैजान हा चांदनी महलच्या आखाड्याच्या गल्लीत आहे. त्या आधारे विनोदकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पुष्पेंद्र यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. उसे पकड़ लिया. त्याच्यावर भा.दं.वि. च्या कलम ३३६ आणि आर्म्स अॅक्ट या कलमाखाली त्याच्याविरोधार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हिडीओत वापरण्यात आलेली देशी पिस्तुलही जप्त केली आहे.