नवी दिल्ली - एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहणार असल्याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत बोलताना दिली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते राज्यसभेत बोलत होते. यावर भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेतकरी अडचणीत टाकण्यात येत आहेत. एमएसपी संपणार असे आम्ही कधीच म्हटलं नाही. एमएसपीवर कायदा करावा, अशी आमची मागणी आहे. तरच देशातील शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होईल. एमएसपीवर कोणताही कायदा नाही. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत, असे राकेश टिकैत म्हणाले.
पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, आव्हाने आणि समस्या आहेत. मात्र, आपल्याला समस्येचा भाग व्हायचं की समाधान व्हायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. यावर राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली. जर केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले तर ही समस्याच संपेल, असे टिकैत म्हणाले.
सामान्य नागरिकांचा आंदोलनाला पाठिंबा -
नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना आंदोलनांच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला मारला. देशात आंदोलनजीवी ही नवी जमात अलिकडे वाढल्याचे मोदी म्हणाले. त्यावरही राकेश टिकैत यांनी उत्तर दिले. पंतप्रधान बरोबर बोलले. शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठीशी देशातील सामान्य नागरिक उभा आहे, असे टिकैत म्हणाले.
केंद्र आणि सरकारदरम्यान चर्चा -
संसदेतील भाषणादरम्यान मोदींनी कृषी कायद्यावरुन निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले. जर सरकार चर्चेसाठी तयार आहे. तर किसान संयुक्त एकता मोर्चाही चर्चेसाठी तयार आहे. आमचा पंचही तोच आहे आणि मंचही तोच आहे. कायदे रद्द करून सरकारे एमएसपीवर कायदा करावा, हीच आमची मागणी कायम आहे, असे टिकैत म्हणाले.
टिकैत यांचे दुधावर भाष्य -
दुधाच्या बाबतीतही देशाची स्थिती चांगली नाही. हीच परिस्थिती राहिल्यास तुर्कीसारखी परिस्थिती होईल आणि दुधही बाहेरून घ्यावे लागेल. निवृत्ती वेतन सोडण्याची विनंती मोदींनी सर्व खासदारांना करावी, असे राकेश टिकैत म्हणाले.