नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना संकटामुळे 21 दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिक घरांमध्ये सुरक्षित आहेत. मात्र, क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने भरलेल्या तुरुंगातील कैद्यांचे काय? जर एखाद्या कैद्याला कोरोनाची लागण झाली तर इतर कैदी संसर्गापासून वाचण्याची शक्यता कमीच. त्यामुळे दिल्लीतील तिहार तुरुंगाने कोरोनाच्या भीतीने 356 कैद्यांची 45 दिवसांच्या अंतरीम जामीनावर सुटका केली आहे.
तसेच 63 कैद्यांना 8 आठवड्यांचा एमर्जंन्सी पॅरोल देण्यात आला आहे. कोरोनापासून बचावासाठी तिहार तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तिहार तुरुंगाने हा निर्णय घेतला. मात्र, देशातील इतर तुरुंगांची अवस्थाही अशीच आहे. क्षमतेपेक्षा जास्त संख्येने कैद्यांना तुरुंगात ठेवले जाते. तसेच तुरुंगांमध्ये स्वच्छतेचा अभावही असतो.
दररोज नवे कैदी तुरुगांत येत असतात. त्यांच्यापासून आधीच तुरुंगात असलेल्या कैद्यांनाही धोका आहे. तो धोका टाळण्यासाठी अनेक कैद्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भारतामध्ये 850 पेक्षाजास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर जगभरात 6 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.