नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनाने फाशीच्या शिक्षेची तयारी सुरू केली आहे. तुरुंग प्रशासनाने चारही गुन्हेगारांना नोटीस पाठवून शेवटची इच्छा विचारली आहे.
दोषींना फाशीपूर्वी कुठले धार्मीक पुस्तक वाचायची किंवा कोणत्या धर्मगुरुची भेट घ्यायची इच्छा आहे का? कुणाला शेवटचे भेटायचे आहे का? तसेच स्वत:च्या नाववर असलेली मालमत्ता इतर कुणाच्या नावे करायची आहे का? अशा स्वरुपाचे प्रश्न तिहार तुरुंग प्रशासनाकडून त्यांना विचारण्यात आले आहेत.
दरम्यान तिहार तुरुंगात कैदेत असलेले निर्भया प्रकरणातील चारही आरोपी सध्या तणावाखाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. फाशीच्या भीतीने चारही आरोपींनी खाणे-पिणे कमी केले आहे. तुरुंगातील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दिल्लीमधील ती काळी रात्र...
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ‘निर्भया’चा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये २९ डिसेंबर २०१२ ला मृत्यू झाला होता. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला.