भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये असणाऱ्या वन विहार राष्ट्रीय उद्यानातील एका वाघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याला कारण म्हणजे, या वाघाची वारंवार मानवी वसाहतीत जाण्याची सवय. सारन असे या वाघाचे नाव आहे. २०१८च्या डिसेंबरमध्ये त्याला पहिल्यांदा पकडण्यात आले होते, जेव्हा तो महाराष्ट्रातील एका मानवी वसाहतीमध्ये शिरला होता.
ऑक्टोबर २०१८मध्ये अमरावतीमधील दोन माणसांना या वाघाने ठार केले होते. त्यानंतर मध्यप्रदेशच्या बेतुल जिल्हामधील सारानी गावामध्ये फिरत असताना या वाघाला पकडण्यात आले होते. उद्यानाच्या एका कर्मचाऱ्याने याबाबत माहिती दिली.
पकडल्यानंतर त्याला मध्यप्रदेशमधील सातपुडा व्याघ्र प्रकल्पामध्ये राहण्यासाठी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतरही तो वाघ वारंवार मानवी वसाहतींमध्ये शिरताना आढळून आला. २०१९च्या फेब्रुवारीमध्ये त्याला पुन्हा सारानीमधून पकडण्यात आले, आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्यात आले.
मात्र त्यानंतरही या वाघाची मानवी वसाहतीत जाण्याची सवय न सुटल्यामुळे, त्याला शनिवारी वन विहार राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. त्याला आता तिथे विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सारनचा समावेश झाल्यामुळे आता वन विहार राष्ट्रीय उद्यानातील वाघांची संख्या १४ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : बेळगाव जिल्ह्यातील 'हे' गाव अखेर कोरोनामुक्त