तिरुवअनंतपुरम : केरळच्या कोळीकोड जिल्ह्यात तीन जंगली हत्तींचा मृत्यू झाल्याचे रविवारी समोर आले. यामध्ये एका पिल्लाचाही समावेश आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामधील दोन प्रौढ हत्तींचा अपघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर, पिल्लाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विहिरीत पडून हत्तीणीचा मृत्यू..
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी एक २० वर्षीय हत्तीण विहिरीत पडली होती. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर शनिवारी रात्री उशीरा तिला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तिला बाहेर काढल्यानंतर तिच्यावर उपचार करुन, तिला मुबलक पाणी आणि अन्न पुरवण्यात आले होते. त्यानंतर ती स्वतः जंगलात जाईल असे आम्हाला वाटले, मात्र थोडे अंतर चालल्यानंतर ती खाली कोसळली, आणि तिचा मृत्यू झाला असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या एका हत्तीची हत्या झाल्याचा संशय..
दुसऱ्या एका घटनेत, एक २० वर्षीय हत्ती एका शेतात मृतावस्थेत आढळून आला. या हत्तीचे सुळे गायब होते. या हत्तीला मारण्यात आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणी चौकशी करत आहोत, असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : तस्करांकडून हस्तगत केलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला जीवदान