चंदीगढ : हरियाणाच्या गोहाना जिल्ह्यामध्ये भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. खानापूर मार्गावर ट्रॅक्टर आणि चारचाकीमध्ये टक्कर झाल्यामुळे कारला आग लागली. या आगीमध्ये कारमध्ये बसलेले तिघे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
कार चालकाची ओळख पटली असून, त्याचे नाव सुरेंद्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुरेंद्र भाड्याने गाडी चालवत असे. गाडीमध्ये आढळलेल्या बाकी दोन मृतदेहांची ओळख पटली नसून, त्याबाबत तपास सुरू आहे. गाडीला लागलेली आग एवढी भीषण होती, की ती पूर्णपणे विझेपर्यंत आतमध्ये किती लोक आहेत हेदेखील कळून येत नव्हते. आग आटोक्यात आल्यानंतर गाडीत तीन मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. यांपैकी एक मृतदेह पुढच्या सीटवर, दुसरा मागच्या सीटवर तर तिसरा दोन्हीच्या मध्ये होता. म्हणजेच, टक्कर इतकी जोरात होती की मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती धक्क्याने उडून दोन्ही सीटच्या मध्ये पडली.
मृतदेह इतक्या प्रमाणात जळाले आहेत, की दोन मृतदेहांपैकी दोघेही पुरुष आहेत, की एक महिलाही आहे हेदेखील कळून येत नाहीये. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करुन, सर्व मृतदेह खानापुरमधील बीपीएस महिला वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत. तसेच, ट्रॅक्टर चालकही फरार आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : बंगळुरात एनआयएची कारवाई, दोन संशयित दहशतवाद्यांना अटक