श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अवंतीपोराच्या मंदूरा त्राल या भागात ही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यानंतर काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली.
हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी..
हे तीन दहशतवादी स्थानिक असून, ते हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरिफ बशीर शेख, वारिस हसन भट आणि सईद आसिफ उल हक अशी या तिघांची नावे आहेत. या दहशतवाद्यांकडून एक एके-४७ रायफल, दोन पिस्तूल आणि चार ग्रेनेड्स जप्त करण्यात आले आहेत.
२०२१ मधील पहिली चकमक..
२०२१मधील ही पहिली चकमक होती, असे विजय कुमार यांनी स्पष्ट केले. या वर्षी आम्ही जास्तीत जास्त दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यावर, आणि नवीन भरती न होऊ देण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. यासाठी काश्मीरमधील तरुण आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशनही आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : दिल्लीमध्ये इस्राईलच्या दूतावासाबाहेर स्फोट; वाहनांचे नुकसान