जम्मू काश्मीर - राज्यात अतिरिक्त सैन्य तैनात केल्यामुळे नारिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी हल्ले होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे सैन्य वाढवल्याचे लष्कराने म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकार कलम- ३७० आणि कलम ३५- A रद्द करणार असल्याच्या अफवांना पूर आला आहे. नागरिक घरांमध्ये अन्न आणि औषधांचा साठा करुन ठेवत आहेत. दहशतवादी हल्ला घडण्याची शक्यता असल्याने नागरिक भेदरलेले आहेत.
शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना तत्काळ काश्मीर सोडून घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. पर्यटकांनाही राज्य सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशी पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचेही हाल होत आहेत. अमरनाथ यात्रा मार्गावर घातपात होण्याची शक्यता असल्याने ही यात्राही रद्द करण्यात आली आहे.
भाविकांना माघारी जाण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा दलाला अमरनाथ यात्रा मार्गावर मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीआरपीएफ दलाच्या जवानांच्या सुट्टयाही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राज्यामधील सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत आहे. लष्करी अधिकारी आणि पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना इशारा दिला. पाकिस्तान भारतामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याच्या पोलीस महासंचालकांनी केला यावेळी केला. सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर केली जात नाही, असे म्हणत गृहमंत्रालयाने खोऱ्यामध्ये २८ हजार सैन्य का वाढवले याबाबतची माहिती देण्यास नकार दिला आहे. प्रशिक्षण आणि सैन्यांच्या स्थानांमध्ये कायम बदल केले जातात, असे उत्तर गृहमंत्रालयाने दिले आहे. मात्र, सरकार काहीतरी मोठे पाऊल उचलण्याच्या हालचाली करत आहे, अशा अफवा पसरत आहेत.
पर्यटकांना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश दिल्यामुळे देशी विदेशी पर्यटकांचे हाल होत आहेत. हॉटेल खाली करण्याचे आदेश अचानक दिल्यामुळे कोठे रहायचे असा प्रश्न या पर्यटकांपुढे उभा राहिला आहे. हॉटेलमध्ये पर्यटकांनी केलेली आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. तत्काळ राज्य सोडून जाण्यासाठी पर्यटक विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत.
कामगारांनाही ४ ते ५ दिवसात राज्य सोडून जाण्यास सांगितल्याच्या अफवा पसरत आहेत. लोक घरांमध्ये अन्नधान्य आणि औषधाचा साठा करुन ठेवत आहेत. दहशतवादी काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे लष्कराने उपाययोजना केली आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका...
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शुक्रवारी राज्यातील राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यपाल मलिक यांनी मेहबूबा मुफ्ती, शाह फैझल, सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांची भेट घेतली. स्थानिक नेत्यांनीही सरकार ३७० कलम आणि कलम ३५ -A वरुन उठत असलेल्या अफवांवरुन चिंता व्यक्त केली आहे.