मुंबई - येथील कुलाबा परिसरातील प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पाकिस्तानातील कराचीहून सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या फोननंतर ताज हॉटेलबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
गेल्या सोमवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीच्या बाहेर बेछूट गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रेनेड हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 4 दहशतवाद्यांचाही मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आतंकी हल्ला झाल्यानंतर भारतात अशाच प्रकारचा आतंकी हल्ला करण्याचा कट रचला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानहून समुद्रामार्गे 10 दहशतवादी आले होते. यावेळी हे दहशतवादी ताज हॉटेल येथेही घुसले होते. यातील 9 दहशतवाद्यांना कंठस्थान घालून एकाला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. जिवंत पकडण्यात दहशतवाद्याचे नाव अजमल कसाब होते. त्याला 21 नोव्हेंबर 2012 ला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर ताज हॉटेलबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली. तसेच नौदलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.