भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचे समर्थन केले आहे. त्यांनतर आता 'हिंदुत्त्वाला दहशतवाद म्हणणारे देशद्रोही' असल्याचे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केले आहे.
'१९८४ च्या शीखविरोधी दंगली या दंगली नव्हत्या. ते हत्याकांड होते. मध्यप्रदेशचे आताचे मुख्यमंत्रीही त्यात दोषी आहेत. हिंदुत्त्वाला दहशतवाद संबोधणारे देशद्रोही, लष्करविरोधी आणि धर्मद्रोही आहेत. या हिंदुत्वविरोधी आणि समाजविरोधी लोकांनी स्वतःच्या नाशाची चिंता करावी,' असे प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.
'जेव्हा १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, मोठी झाडे कोसळत असतात, तेव्हा जमीन हादरतेच. यानंतर देशभरात शीखांवर हल्ले सुरु झाले. हा दहशतवाद नव्हता का?, यानंतर त्याच व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवण्यात आले, त्यावेळी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले नाही,' असे मोदींनी म्हटले होते.
त्यानंतर आता प्रज्ञा सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांना दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविषयी विचारले असता, त्यांनी 'मी अयोग्य किंवा अविवेकी विधान केले नव्हते. मी त्याविषयी आधीच माफी मागितली आहे. मात्र, मी निर्दोष असताना आणि तपास संस्थांनी मला क्लीन चीट दिलेली असताना मला अमानवीय वागणूक देण्यात आली. मला ९ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. त्याविषयी कोणी माझी माफी मागेल काय,' असा सवालही त्यांनी केला.