चंडीगड - परीक्षा देऊन घरी जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गोळी मारून झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिसऱया आरोपीला अटक केली आहे. अजरू असे फरिदाबाद पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने मुख्य आरोपी तौसीफला पिस्तुल पुरवले होते. पोलिसांनी त्याला नूँह जिल्ह्यातून अटक केली.
दोन आरोपींना झाली होती अटक -
सोमवारी ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी तौसीफसह रेहान नावाच्या आरोपीला अटक केली होती. यातील तौसीफ हा गुरुग्रामचा रहिवासी असून रेहान नूँहचा रहिवासी आहे. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत.
तपासासाठी एसआयटी स्थापन -
वल्लभगड येथे झालेल्या हत्याकांडानंतर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी कठोर पावले उचलली आहेत. अनिल विज यांनी याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. लव जिहादच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणामध्ये गुंडाराज चालू देणार नाही, अस सांगत विज यांनी याप्रकरणाचा 2018 पासून सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण -
सोमवारी पीडित मुलगी परीक्षा देऊन घरी जात असताना आरोपी तौसीफने गोळ्या घालून तिची हत्या केली. आरोपीने या तरुणीला आधी गाडीमध्ये बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने याला विरोध केल्याने या त्याने तिच्यावर गोळीबार केला, त्यात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी तौसीफ आणि त्याचा साथीदार रेहान याला अटक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.