नवी दिल्ली - मला मतदान केले नाही, तर मी तुमचे प्रश्न सोडवणार नाही, अशी धमकी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुस्लिमांना दिली आहे. मुस्लीम जनतेशिवाय माझा विजय झाला, तर ते मला चांगले वाटणार नाही, असेही गांधी म्हणाल्या. यासंदर्भातील गांधी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मी निवडणूक जिंकणार आहे. लोकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे माझा विजय होईल. पण माझा विजय मुस्लीम मतांशिवाय झाला तर ते योग्य ठरणार नाही. त्यानंतर जर मुस्लीम माझ्याकडे काही कामासाठी आले, तर मी म्हणेल जाऊ दे. द्या आणि घ्या असे हे सरळ गणित आहे. आपण काही महात्मा गांधींची मुले नाहीत? असेही गांधी म्हणाल्या.
मेनका यांचा हा ३ मिनिटांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सुलतानपूर येथील तूरभूक्खनीमधील सभेतील हा व्हिडिओ आहे. मेनका गांधी पीलभीत येथून ६ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. मी आधीच ही निवडणूक जिंकली आहे पण तुम्हाला माझी गरज भासणार आहे, असेही मेनका म्हणाल्या.
माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने अर्धवट वाक्य दाखविले; मेनका गांधींचे स्पष्टिकरण
आपण असे कुठलेच वक्तव्य केले नसून माध्यमांनी आपल्या भाषणातील ठराविक भाग प्रसारित केला असल्याचे स्पष्टिकरण मेनका गांधी यांनी दिले आहे. 'मी स्वत: आमच्या अल्पसंख्यांक विभागाची बैठक बोलावली होती. जर तुम्ही माझे संपूर्ण भाषण वाचले तर तुमच्या लक्षात येईल की सर्व काही प्रेमाने पार पडले आहे. वाहिन्यांनी माझ्या भाषणातील एकच वाक्य उचलून ते अर्धवटरित्या प्रसारित केले आहे', असेही मेनका यांनी सांगितले.