नवी दिल्ली - पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तथा माजी उपायुक्त सोहेल मेहमूद काल ईद निमित्त भारतात हजर होते. यावेळी त्यांनी भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर पुढील आठवड्यात किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची बैठक होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, परराष्ट्र मंत्रालायाचे अधिकृत प्रवक्ते रवीश कुमार यांनी या बैठकीची शक्यता फेटाळताना नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात अशा कोणत्याही बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही, असे स्पष्ट केले आहे.
रवीश कुमार म्हणाले, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव यांनी खासगी भेट दिली होती. त्यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. आम्ही पाकिस्तानला याआधी झालेल्या विवादीत मुद्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. काही महत्वाच्या प्रस्तावावर आम्ही मागील बैठकीत स्पष्टीकरण मागितले असून अद्याप त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
महमूद यांनी ईदनिमित्त दिल्लीतील जामा मशिदीत नमाज पठण केले. त्यांच्यासोबत पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारीही होते. मात्र, महमूद यांच्या भेटीसंबंधी भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच पाकिस्तानी दूतावास यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. महेमूद हे यापूर्वी भारतातील पाकिस्तानी राजदूत म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी करण्यात आली आहे.
इम्रान खान यांनी भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. २०१६ पासून भारत-पाक संबंधात बिघाड सुरू झाले आहेत. त्यातच यावर्षी पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणावग्रस्त परिस्थिती होती. यामध्ये ४२ जवानांना वीरमरण आले होते. भारतानेही याचा बदला घेत बालाकोट एअर स्ट्राईक हल्ला घडवून आणला होता.