नवी दिल्ली - जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली असून मृतांचा आकडा 19 हजाराच्या पुढे गेला आहे. चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात सर्वात प्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. मात्र, या विषाणूचा उगम चीन आहे, असा एकही पुरावा पुढे आला नाही, असे भारतातील चीनी दुतावासाने म्हटले आहे.
अमेरिका, युरोप, चीन, जपान येथील संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाचा उगम निश्चित कोठे झाला हे सांगितले नाही. वुहानमध्ये जरी कोरोनाचा सर्वात प्रथम प्रसार झाला असला तरी चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला, यास पुरावा नाही. चीनी नागरिकही कोरोनाचे बळी ठरले आहेत, असे भारतातील चीनी दुतावासाने म्हटले आहे.
चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा वुहान शहरातील प्रशासनाने याकडे गांभीर्याने घेतले नाही. उलट खोटी माहिती पसरवत असल्यावरून डॉक्टरांना तंबी दिली. पुढे जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झाला, या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टराच्या मृत्यूनंतर चीनमध्ये संतापाची लाट पसरली होती.
हेही वाचा - कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा आगाऊ पगार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोना विषाणूला 'चीन व्हायरस', असे संबोधले आहे. चीनने जगाला सतर्क करायला हवे होते, असे ट्रम्प म्हणाले आहेत. सुरुवातीच्या काळात चीनने ज्या पद्धतीने कोरोना विषाणूचे प्रकरण हाताळले, त्यावर जगभर टीका झाली. चीनने आधीच उपाययोजना केल्या असत्या तर जगभर कोरोनाचा प्रसार रोखता आला असता. कोरोनाच्या प्रसारानंतर चीनच्या आहाराच्या सवयींवरही सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. साप, वटवाघूळ, उंदीर, खवले मांजर, कुत्रा खात असतानाचे फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावरून व्हायरल झाले. हे फोटो नक्की कोणत्या देशातील आहेत, याची खात्री नसतानाही चीनच्या नावाने हे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले.
आता कोरोनाचा प्रसार जगभर झाला आहे. 160 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चीनविरोधी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आता कोरोना चीनमधून आला यास पुरावे नसल्याचे चीनने म्हटले आहे.
हेही वाचा - महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले, कोरोनाविरुद्धचे युद्ध आपणास २१ दिवसात जिंकायचंय - मोदी