प्रश्नः काँग्रेसच्या प्रचारादरम्यान तुमच्या मातोश्री आणि तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांवर सातत्याने बोलले जात आहे. मात्र, या महत्त्वपुर्ण निवडणुकांमध्ये तुमचा सक्रिय सहभाग दिसून आला नाही, ही बाब आश्चर्यदायी आहे. तुमची प्रतिक्रिया!
दिल्लीतील बहुतांश काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या दिल्लीची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेतृत्वाबरोबर माझे मतभेद आहेत. आत्ता यावेळी याविषयी बोलण्यात काहीही अर्थ नाही. मात्र, नेतृत्वाविषयी समस्या आहेत. त्यामुळे, मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून असक्रिय आहे. जेव्हा शीलाजींची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून झाली, मी त्यांना काही काळ मदत करत होतो. तेव्हापासून मी पडद्यामागे राहून काँग्रेससाठी राजकीय काम करत आहे.
प्रश्नः काँग्रेसला 2015 मधील निवडणुकांमध्ये एकाही जागेवर यश मिळाले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, यंदाही पक्षाने लढाऊ पवित्रा घेतलेला दिसत नाही. यावेळी पक्षाचे काय भवितव्य आहे, असे तुम्हाला वाटते?
एकही आमदार हाती नसणे आणि महानगरपालिका निवडणुकीतही चांगली कामगिरी न होणे ही पक्षासाठी साहजिकच पीछेहाट होती. आम्ही कठीण परिस्थितीचा सामना करीत होतो. मात्र, 2019 मधील लोकसभा निवडणुकीत आम्ही 5 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होतो, ही बाब आश्वासक आहे, आणि उमेदवार लवकर जाहीर झाले असते तर इतर आणखी दोन जागांवर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो असतो. शीलाजींचे जाणे हे मोठे नुकसान होते. आमच्या पुढ्यात दोन मोठी आव्हाने आहेत. आमच्याकडे आप आणि भाजपकडे आहेत तशा प्रकारची संसाधने नाहीत. माध्यमांनी तत्त्वांशी तडजोड केलेली आहे. आपचे सरकार हे अतिशय सामान्य दर्जाचे सरकार आहे आणि मी त्यांची प्रचार मोहीम ऐकली आहे. हा प्रचार चुकीचा आहे. लोक पहिल्यांदाच विकासकामांसाठी मतदान करीत आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया असे म्हणत आहेत की, त्यांनी सरकारी शाळांचा कायापालट केला आहे. मात्र, शीलाजींच्या काळातदेखील या शाळा चांगली कामगिरी करत होत्या. दिल्ली परिवहन मंडळाच्या बसेसची संख्या कमी झाली आहे आणि हरित आच्छादनदेखील कमी होत आहे. प्रदुषण 25 टक्क्यांनी कमी झाले आहे, हा केजरीवाल यांचा दावा साफ चुकीचा आहे.
प्रश्नः परंतु काँग्रेसचा प्रचार एवढा तेजोहीन असण्याचे कारण काय?
पोस्टर्स आणि माध्यमांमध्ये आमची उपस्थिती नाही. शीलाजींच्या सरकारकडे पानभर जाहिरातींसाठी कधीही निधी उपलब्ध नव्हता. मात्र, केजरीवाल एक दिवसाआड वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती देत आहेत आणि याचा परिणाम माध्यमांवर होतो. त्यांनी सरकारी निधीचा गैरवापर केला आहे. काँग्रेसच्या सुवर्णकाळाचे आश्वासन पुर्ण करत आणि केजरीवाल यांनी सुरु केलेले अनुदान कायम ठेवत मात्र त्यामध्ये आणखी सुधारणा करीत या प्रचाराचा विरोध करु शकतो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही बाब मतदारांच्या लक्षात येईल, असा मला विश्वास आहे. मात्र, ज्या लोकांनी काँग्रेसचा काळ पाहिलेला नाही आणि केवळ आपचा प्रचार ऐकला आहे तर हे आव्हानास्पद आहे. आता 18 ते 35 वयोगटात असलेले लोक शीला सरकारने 1998 सालापासून दिल्लीत जे विलक्षण बदल घडवून आणले त्याबाबत जागरुक नव्हते.
प्रश्नः काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला नाही. का?
आम्ही कधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला नाही. काँग्रेसने कायमच जुन्या संसदीय लोकशाही प्रणालीचे अनुसरण केले आहे. अध्यक्षीय धाटणीतील निवडणुकांवर काँग्रेसचा विश्वास नाही. जेव्हा शीलाजी 2003 आणि 2008 साली निवडून आल्या होत्या, तेव्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांचा प्रचार करण्यात आला नव्हता.
प्रश्नः मग काँग्रेसची लढत कोणाशी आहे, आप की भाजप? केजरीवाल मृदू-हिंदुत्वाची खेळी खेळत आहेत का?
हे पहा, केजरीवाल हे तोतया आहेत. माझ्यासाठी ते मेंढीच्या वेशातील लांडगा आहेत. मूळतः ते एक आरएसएस कार्यकर्ते आहेत ज्यांनी दुसऱ्या कोणाचा तरी मुखवटा धारण करीत आहे. ते सत्तेचे भुकेले आहेत. खरंतर, ते भाजपचाच भाग आहेत. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीत ते दिवंगत अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्यासारख्या भाजप नेत्यांना बिलगत होते. आता ते म्हणतात की मी भगवद्गीता वाचतो आणि हनुमान चालीसा पठण करतो. मी असे म्हणत नाही की हे धार्मिक ग्रंथ तुम्हाला मार्गदर्शन करीत नाहीत. मात्र, तुम्ही भाजपएवढेच हिंदुत्ववादी आहात हे दाखवण्यासाठी त्याचा आधार घेत आहात. एका चांगल्या माणसाने मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा आहे. मात्र, तुम्ही (केजरीवाल) भारतीय राज्यघटनेच्या कल्पनेतील नेते आहात काय? तशा अर्थी केजरीवाल हे तोतया आहेत.
प्रश्नः दिल्ली निवडणुकीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा(सीएए) हा मुद्दा आहे का?
मला असे वाटत नाही, मात्र हा राष्ट्रीय मुद्दा आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात उभा आहे. दिल्ली मुख्यमंत्र्यांनी सीएएविरोधात वक्तव्य केले मात्र ते एनआरसीची अंमलबजावणी करणार की नाही, याबाबत काही सांगितले नाही. त्याचप्रमाणे, माझ्या हाताखाली पोलिस असते तर मी दोन तासात शाहीन बाग आंदोलन पांगवले असते, असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. मात्र कशाप्रकारे हे त्यांनी सांगितले नाही. खरंतर, याबाबतीत मला केंद्राचे कौतुक करावेसे वाटते की त्यांनी आंदोलकांना त्रास दिला नाही. केजरीवाल हे भाजपच्या प्रवेश वर्मांची भाषा बोलत आहेत, असे वाटत आहे.
प्रश्नः राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस कोणत्या आव्हानांचा सामना करीत आहे?
विस्तृत सामाजिक लोकशाही व्यवस्थेप्रती आमची बांधिलकी होती. परंतु आम्हाला याची पुन्हा एकदा व्याख्या करण्याची गरज आहे. बहुतांश लोकांना काँग्रेसचे स्थान माहीत आहे, मात्र त्यांना पक्षाने केवळ त्या मूल्यांसाठी भूमिका घेणे अपेक्षित आहे. परंतु अडचण तेव्हा होते जेव्हा काँग्रेसकडून आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान मोदींचे सगळे सुप्रसिद्ध उपक्रम हे खरंतर युपीएचे उपक्रम आहेत. मात्र, या सरकारकडे खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. मोदींच्या एकाही उपक्रमाचे श्रेय त्यांना देता येणार नाही. भाजपने केवळ हिंदुत्व नॅरेटिव्ह आणि त्यांचा स्वतःचा राष्ट्रवादाचा ब्रँड निर्माण केला आहे. त्यांच्या हिंदु राष्ट्र कल्पनेत काहीही तथ्य नाही. त्यामध्ये मुस्लिमांचे मूलभूत अधिकार नाकारण्यात आलेले आहेत. हे केवळ ब्रीदवाक्य आहे. काँग्रसने आतापर्यंत कधीही आक्रमक भूमिका घेतलेली नाही. मात्र, काँग्रेसने आपली भूमिका अधिक प्रभावीपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये मांडण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि काळानुरुप सिद्ध झालेल्या कल्पनांची मांडणी नव्या भाषेत योग्य रीतीने मांडण्याची गरज आहे.
- अमित अग्निहोत्री.