नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 1 लाखाचा आकडा पार केला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे, यात 77 हजार 103 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 57 हजार 720 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 4 हजार 21 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 50 हजार 231 कोरोनाबाधित असून 1 हजार 635 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 16 हजार 227 कोरोनाबाधित तर 111 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 14 हजार 56 कोरोनाबाधित असून 858 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 13 हजार 418 कोरोनाबाधित तर 261 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर जगाची आकडेवरी पाहिल्यास, जगभरात 54 लाख 98 हजार 580 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 46 हजार 688 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 23 लाख 2 हजार 27 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात