नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना अशी आपल्या राज्यघटनेची ओळख आहे. ही घटना लिहिण्यासाठी एकूण २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्यासोबतच, घटना समितीमधील काही पुरुष सदस्यांचे योगदानही आपल्याला परिचित आहे. मात्र, या समितीच्या सदस्य असलेल्या महिलांची नावे ही काळाच्या पडद्याआड गेल्याचे दिसून येत आहे.
घटनेच्या निर्मितीमध्ये आपले योगदान असलेल्या १५ महिलांपैकी ८ महिलांच्या स्वाक्षऱ्यादेखील या राज्यघटनेवर आहेत. घटना निर्मितीमध्ये सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन, सरोजिनी नायडू, विजया लक्ष्मी पंडित, दुर्गाबाई देशमुख, राजकुमारी अमृत कौर, हंसा मेहता, बेगम ऐझाज रसूल, मालती चौधरी, कमला चौधरी, लीला रॉय, दक्षायणी वेलायुधन, रेणुका राय, अॅनी मॅस्कारेन आणि पूर्णिमा बॅनर्जी या १५ महिलांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे.
सुचेता कृपलानी -
हरियाणामध्ये जन्मलेल्या सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होय. चले जाव आंदोलनातील त्यांचा सहभाग हा सर्वश्रुत आहे. चंद्रा भानू गुप्ता यांच्यानंतर, उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १९६७ पर्यंत त्या मुख्यमंत्री पदावर होत्या.
अम्मू स्वामीनाथन -
केरळच्या पालघाट जिल्ह्यात जन्मलेल्या अम्मू स्वामीनाथन या १९५२ मध्ये लोकसभेवर, तर १९५४ मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. १९४६ मध्ये मद्रास प्रांतातून त्यांची घटना समितीमध्ये निवड करण्यात आली होती.
सरोजिनी नायडू -
हैदराबादमध्ये जन्मलेल्या सरोजिनी नायडू या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष, आणि भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्या एक उत्कृष्ट कवयित्रीदेखील होत्या. त्यांच्या कवितांमुळे त्यांना 'भारतीय नाईटिंगेल' (गाणारा बुलबुल पक्षी) म्हणूनही ओळखले जाते.
विजया लक्ष्मी पंडित -
१८ ऑगस्ट १९००ला अलाहाबादमध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहिण होत्या. १९३६ला त्यांची संयुक्त प्रांतांच्या विधानसभेमध्ये निवड झाली. तर, १९३७ मध्ये त्या स्थानिक स्वराज्य मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री झाल्या. केंद्रीय मंत्रीपद मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होय.
दुर्गाबाई देशमुख -
१५ जुलै १९०९ला राजमुंद्रीमध्ये दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म झाला. त्या खासदार आणि नियोजन आयोगाच्या सदस्य होत्या. भारतात साक्षरतेचा प्रसार करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल १९७१ला त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार देण्यात आला. तर, १९७५ला त्यांना देशातील उच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्म विभूषण पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला.
राजकुमारी अमृत कौर -
१८८९ साली उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म झाला. त्या देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या. या पदावर त्यांनी दहा वर्षे कार्यकाळ सांभाळला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एआयआयएमएस) त्या संस्थापक होत्या.
हंसा मेहता -
समाज सुधारक आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या हंसा मेहता, या एक उत्कृष्ट शिक्षिका आणि लेखिका होत्या. त्यांनी लहान मुलांसाठी गुजरातीमध्ये अनेक पुस्तके लिहिली. गलिवर्स ट्रॅव्हल्स या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकासह, अनेक इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी गुजरातीमध्ये भाषांतर केले.
बेगम ऐझाज रसूल -
बेगम ऐझाज रसूल या संविधानाच्या घटना समितीमधील एकमेव मुस्लीम महिला होत्या. १९५२ ला त्या राज्यसभेवर निवडून आल्या. तर, १९६९ ते १९९० पर्यंत त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या. २००० साली त्यांना समाजकार्यामधील त्यांच्या योगदानासाठी देशातील उच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मालती चौधरी -
१९०४ साली पूर्व बंगालमध्ये (आताचा बांगलादेश) मालती चौधरींचा जन्म झाला. त्यांनी आपले पती नबकृष्णा चौधरी यांच्यासह उत्कल काँग्रेस समाजवादी कर्मी संघाची स्थापना केली. हेच नंतर, अखिल भारतीय काँग्रेस सोशिअलिस्ट पक्षाची ओडिशा प्रांतीय शाखा म्हणून ओळखले जाऊ लागले.
कमला चौधरी -
लखनऊमध्ये जन्मलेल्या कमला चौधरी या, १९३० साली गांधीजींनी पुकारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी होत्या. ७०च्या दशकामध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या. त्या एक चांगल्या लेखिका म्हणूनही लोकांना परिचित होत्या.
लीला रॉय -
असाममध्ये जन्मलेल्या लीला रॉय यांनी बेथुन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या अखिल बंगाली महिला मताधिकार संघटनेच्या सचिव झाल्या.
दक्षायणी वेलायुधान -
१९१२मध्ये कोचीनच्या बोलगट्टी बेटावर दक्षायणी वेलायुधान यांचा जन्म झाला होता. १९४५ला राज्यसरकारने कोचिन विधानसभेवर त्यांची निवड केली. १९४६मध्ये विधानसभेवर निवडून गेलेल्या त्या पहिल्या आणि एकमेव दलित महिला होत्या.
रेणुका राय -
सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या रेणुका राय या केंद्रीय विधानसभा, संविधान समिती आणि १९४३ ते १९४६ दरम्यानच्या हंगामी संसदेच्याही सदस्या होत्या. १९५२ ते १९५७ दरम्यान त्या पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये, मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.
अॅनी मॅस्कारेन -
केरळच्या तिरूवअनंतपूरममध्ये जन्मलेल्या अॅनी या त्रावणकौर राज्य काँग्रेसमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या काही महिलांमध्ये होत्या. तर, त्रावरकौर काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सहभागी असणाऱ्या त्या पहिल्याच महिला. १९५१ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या अॅनी या केरळच्या पहिल्या महिला खासदार होय.
पूर्णिमा बॅनर्जी -
अलाहाबादमधील राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या पूर्णिमा बॅनर्जी या सचिव होत्या. १९३० ते १९४० दरम्यान स्वातंत्र लढ्यात सहभागी असणाऱ्या महिलांमध्ये पूर्णिमा यांचे नाव विशेष आहे.
हेही वाचा : राज्यघटनेविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?