नवी दिल्ली - 'अगर वो मेरा नया-नवेला याक न होता तो शायद मै उसकी तलाश करने भी न जाता और शायद मै पाकिस्तानी घुसपैठियों को देख भी ना पाता.' हे शब्द आहेत 55 वर्षिय ताशी नामग्याल या मेंढपाळाचे. ज्यांनी मे 1999 मध्ये सर्वात आधी पाकिस्तानी सैनिक भारतातील जमिनीवर लपून बसल्याचे पाहिले होते. परिणामी भारताने कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला हरवले आणि सैन्यांना मागे घ्यायला लावले.
1999 मध्ये मेंढपाळ ताशी हे कारगिल जिल्ह्यातील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या याकची शोधाशोध करत होते. ते डोंगरावर आणि जंगलात दोन्ही ठिकाणी याकला शोधत होते. मात्र, तो सापडत नव्हता. अथक प्रयत्नानंतर त्यांना याक सापडला. दरम्यान त्याच परिसरात त्यांना कुणीतरी असल्याची कुणकुण लागली. त्यांनी थोड पुढं जावून पाहिलं तर सैनिकाच्या पोशाखात आणि हातात शस्त्रास्त्रे असलेले संशयित सैनिक आढळले. त्यांनी तातडीने जवळच असलेल्या भारतीय लष्कराच्या चेकपोस्टवर संपर्क साधून याची माहिती दिली.
मेंढपाळ ताशी नामग्याल सांगतात की, मी एक सामान्य आणि गरीब घरातील मेंढपाळ आहे. त्यावेळी 12 हजार रुपयांना याक खरेदी केला होता. दरम्यान, जनावरे चरायला घेऊन गेल्यानंतर डोंगरामध्ये याक हरवल्यामुळे चिंता वाटत होती. एऱ्हवी संध्याकाळपर्यंत येणार याक त्यादिवशी मात्र लवकर आलाच नाही. म्हणून मी स्वत: त्याला शोधण्यासाठी बाहेर पडलो. त्यादिवशी याक तर सापडला मात्र त्यासोबत पाकिस्तानी सैनिकही आढळले.
ताशी हे कारगिलपासून 60 किमी अंतरावर असलेल्या सिंधू नदीच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या गारकोन गावात राहतात. त्यांनी पहिल्यांदा संशयितांना पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं होतं की, हे शिकारी असावेत. परंतु, मला शंका वाटत असल्यामुळे भारतीय लष्करांना याची माहिती दिली असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर ताशी यांना केंद्र सरकारने त्यांच्या सजग आणि बहादूर कार्यासाठी अनेक सन्मान चिन्हे व बक्षीसे दिली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये ३ मे १९९९ ला कारगिल युद्ध सुरू झाले आणि २६ जुलै १९९९ मध्ये या युद्धात भारताने विजय मिळवला. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरू होते. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑपरेशन विजयची सुरुवात केली. तब्बल 2 महिने 3 आठवडे आणि 2 दिवस चाललेल्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे 26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून मानला जातो.