कासरगोड - एखाद्या मंदिरात प्रवेश करताना तुमचं स्वागत मगरीने केले तर कसे वाटेल?, कल्पनाही करवत नाही ना. मात्र, असा प्रकार खरंच घडलाय. केरळच्या अनंतपुरा येथील एका मंदिराच्या प्रवेशद्वारावर मगरीने भाविकांचं स्वागत केलं आहे. मंदिरालगत असलेल्या एका तलावात ही मगर आढळून आली. 'बबिया' असे या दुर्मीळ प्रजातीच्या मगरीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील कुंबाला येथे हे मंदिर आहे.
पुजाऱ्यांनी बोलावल्यानंतर बाहेर येते मगर -
मगरीचे वय ७५ वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरातील मुख्य पुजाऱ्याने मगरीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. या मगरीबद्दल परिसरात कुतुहूल आहे. मुख्य पुजारी आरतीनंतर प्रसादासाठी मगरीला आवाज देतात तेव्हा मगर पाण्यातून बाहेर येते. त्यामुळे लोकांमध्ये मगरीबद्दल आकर्षण आहे. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना आधीच याची कल्पना दिली जाते.
सोशल मीडियावर व्हायरल -
मगर बबिया रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मंदिराजवळ येते. मात्र, याला अनेक जण गांभीर्याने घेत नव्हते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो बघून आता भाविकांचा विश्वास बसत आहे. मगरीला पाहिल्यास आपल्याला पुण्य मिळते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.