नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवादी संघटना आणि सीमारेषेवरील काही लोक खोट्या बातम्या पसरवून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. या खोट्या बातम्या थांबवण्यासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने 4 जी सेवेस विरोध केला आहे. त्यांनी याबद्दल सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे, की दहशतवादी कारवायांचा प्रसार करण्यासाठी इंटरनेटचा गैरवापर केला जात आहे. यासोबतच भडकवणारे बनावट व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले जात आहेत. यामुळे, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
इंटरनेटच्या आधारे दहशतवाद्यांकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यानंतर दहशतवादी हल्ले घडवण्याची तयारी सुरु आहे , असे केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. रेझिस्टन्स फ्रंट आणि तेहरिकी मिलत ए इस्लामी या दहशतवादी संघटना तरुणांना दहशतावादात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ते एका मेसेजिंग अॅपचा वापर करुन तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत आहेत. यासाठी जे अॅप्लिकेशन वापरले जात आहे, ते 2 जी मोबाईल सेवेमध्ये उपलब्ध नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. प्रदेशात 4 जी सेवा सुरु झाल्याने या कारवाया वाढल्या असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.