नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळपासून चकमक सुरू होती. सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे, पंजाबमधील अटारी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.
हिजबुलचा दहशतवादी ताब्यात..
काश्मीरमधून आज सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव जहीर अब्बास लोण असल्याची माहिती समोर आली आहे. तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. तसेच, तो पुलवामा येथील रहिवासी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
चकमकीदरम्यान हा दहशतवादी जखमी झाला होता. त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अटारी सीमेवरुन घुसखोरी..
पंजाबच्या अटारी सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना बीएसएफच्या जवानांनी ठार केले. आज सकाळी हे दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आढळून आली. याच परिसरात गेल्या आठवड्यात एक टेहळणी करणारे ड्रोन आढळून आले होते. बीएसएफ जवानांनी त्यावर गोळ्या चावल्यानंतर हे ड्रोन परत गेले होते.
या अतिरेक्यांकडे एक एके ५६ रायफल, ६१ जिवंत काडतुसे; एक मॅग्नम रायफल, २९ जिवंत काडतुसे; एक पिस्तुल, दोन मॅगझिन्स, दोन पीव्हीसी पाईप्स आणि पाकिस्तानी तीस रुपये आढळून आले आहेत. यासोबतच, अटारी सीमा परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : 'दिल्ली चलो' आंदोलनाचा २२वा दिवस; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी..