जम्मू - पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत रचना अबाधित असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन्सद्वारे शस्त्रे उतरवणे हे नवीन आव्हान असून भारत-विरोधी घटकांही एकमेकांशी संधान बांधून एकत्र येत आहेत. याही आव्हानाचा सामना करावा लागत आहे.
सर्व सुरक्षा संस्था नव्या आव्हानांना निकराने तोंड देत आहेत आणि शत्रू सैन्याच्या कारवायांना आळा घालण्यासाठी कडक पहारा ठेवत आहेत, असे जम्मू सीमेवरील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक एन. एस. जामवाल म्हणाले.
येथील आरएस पुरा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील आर्निया भागातून कोट्यवधी रुपयांच्या 62 किलो हेरॉईनसह दोन पिस्तुले, तीन मॅगेझिन्स आणि 100 राऊंडस ताब्यात घेण्यात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - शांततेसाठी प्रयत्नशील भारताची पाकिस्तानकडून कायम फसवणूक - रामदास आठवले
'पाकिस्तानात दहशतवादाची पाळेमुळे आणि पायाभूत संरचना अबाधित आहेत. शस्त्रे आणि मादक पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न तसेच सीमेवर गोळीबार यासारख्या वाढलेल्या घटनांवरून हे स्पष्ट होते. सध्या दहशतवादी शस्त्रास्त्रे सीमापार पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्यामुळे नवीन धोका निर्माण झाला आहे,' असे ते म्हणाले.
'याविरोधात आम्ही सतर्क आहोत आणि त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे,' असे जामवाल म्हणाले. तसेच,अशा प्रकारच्या कारवाया पहिल्यांदा पंजाबमध्ये नोंदविण्यात आल्या आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरपर्यंत त्या पसरल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले.
20 जून रोजी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कठुआ जिल्ह्यातील रठुआ गावात अमेरिकेन बनावटीच्या एम4 अर्ध-स्वयंचलित कार्बाईन आणि सात ग्रेनेड्ससह साडेपाच किलो वजन वाहून नेणारे हेक्सा कॉप्टरड्रोनवर पाडले. गेल्या आठवड्यात राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना शस्त्रांच्या गुप्त साठ्यासह अटक करण्यात आली होती.
अनेक दहशतवादी संघटना हातमिळवणी करीत असल्याच्या आणि पाकिस्तानच्या आंतर-सेवा गुप्तहेर संघटनेच्या मदतीने खलिस्तानी 'हँडलर्स' भारतात मादक पदार्थांची तस्करी करत असल्याच्या वृत्तांबाबत विचारले असता, संधी मिळेल तेथे भारतविरोधी घटक एकत्र येत आहेत, असे ते म्हणाले.
हेही वाचा - ईशान्य भारतात शस्त्राऐवजी आता सोने अन् सुपारीची तस्करी!