लखनऊ - उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील पत्रकार विक्रम जोशी(35) यांच्या हत्येप्रकरणी शेवटच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गाझीयाबादमधील विजयनगर येथील माता कॉलीनीतील घरासमोर 20 जुलैला विक्रम जोशी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होेती. आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
गंभीर जखमी झाल्याने जोशी यांचे 22 जुलैला निधन झाले होते. गाझीयाबादचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक कलानिधी यांनी ही माहिती दिली. घटनेनंतर 9 आरोपीेंना अटक करण्यात आली होती. तर आकाश बिहारी नामक एक आरोपी फरार होता, त्याचा शोध सुरु होता. त्याची माहिती देणाऱ्याला 25 हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. आज(बुधवारी) सकाळी त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणातील सर्व आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. विक्रम जोशी यांच्या पुतणीला काही गुंड त्रास देत होते. या विरोधात स्थानिक पोलिसांत जोशी यांनी तक्रार दाखल केली होती. त्याचा राग धरून काही गुंडांनी जोशी यांची गोळ्या घालून हत्या केली. तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास विजय नगर पोलीस ठाण्यातून कोतवाली नगर पोलीस ठाण्यात हस्तांतरीत करण्यात आला आहे.