हैदराबाद - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाऊन काळात बाल विवाहचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यात तेलंगणामध्ये जवळपास 204 बालविवाह झाले आहेत, असे तेलंगणा राज्य बाल संरक्षण आयोगाच्या (टीएससीपीसीआर) अहवालात म्हटले आहे.
24 मार्च ते 31 मे या कालावधीत एकूण 204 बालविवाह झाले आहेत. याप्रकरणी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व दंडाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 विषयी जनतेला संवेदनशील बनविण्यासाठी पावले उचलावीत, असे टीएससीपीआरने शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तेलंगणा राज्य बाल संरक्षण आयोगाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. कारण, बालविवाहामुळे मुलींच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो, असे या अहवालात म्हटले आहे. लहान मुलींना लग्नापासून वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अन्यथा याचे परिणाम मुलींच्या जीवनातील प्रत्येक बाबीवर, विशेषत: आरोग्य आणि शिक्षणावर होईल, असे अहवालात म्हटले आहे.
बालविवाह -
बाल विवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. 1929 मध्ये हा कायदा करण्यात आला. त्यात सुधारणा होऊन देशात बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 करण्यात आला. 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अमलात आला. यानुसार मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 असले तर विवाह ग्राह्य मानला जातो.
मुलगी किंवा मुलगा वयात येण्यापूर्वीचा विवाह म्हणजे बालविवाह. काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जाते, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जातात. बालविवाहासंबंधी कायदे करण्यात आले, तरी समाजावर कायद्याचा तसा फारसा प्रभाव पडला नाही. ग्रामीण भागात तुरळक प्रमाणावर आजही बालविवाह होतच आहेत. स्त्रीशिक्षणाचा प्रसार जसजसा होत आहे, तसतसे हे प्रमाण कमी कमी होत आहे.
शिक्षा -
- १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणार्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणार्यास किंवा प्रोत्साहन देणार्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
- बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.