हैदराबाद - महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्याच्या घटनेबाबत देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात प्राथमिक आरोपपत्र दाखल करताना निष्काळजीपणा दाखविल्याच्या कारणावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहे. ही कारवाई सायबराबाद पोलीस आयुक्तांनी केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक एम. रवी कुमार आणि पोलीस हवालदार पी. वेणू गोपाल रेड्डी आणि ए. सत्यनारायण गौड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनर यांनी सांगितले. प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ का लागला, याबाबत सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. सर्व सायबराबाद पोलीस अधिकाऱ्यांना हद्द न पाहता तातडीने गंभीर गुन्ह्यांचे आरोपपत्र दाखल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
हेही वाचा-पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचे आंदोलन
महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून झाल्याच्या घटनेनंतर तेलंगणामध्ये विविध ठिकाणी शनिवारी निदर्शने करण्यात आली आहेत. तर दिल्लीसह देशाच्या इतर भागातही बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली आहेत. युवक काँग्रेसने दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे निदर्शने केली आहेत.
हेही वाचा-डॉ. महिला बलात्कार व हत्या प्रकरणी निदर्शन करणाऱ्या तरुणीला पोलिसांकडून अटक
खून व बलात्कार प्रकरणातमोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन आणि चिंतनकुंटा चिन्नाकेशवुलू या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रंगारेड्डी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्राथमिक चौकशीतून पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिचा जाळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
असा घडला होता गुन्हा-
बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना पीडीतेच्या दुचाकीचे टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी पीडितेचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासात आरोपींना अटक केली.