हैदराबाद- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर शहरातील नागरिक घरगुती खेळ खेळताना दिसत आहेत. ल्युडो, बुद्धिबळ आणि कॅरम अशा प्रकारचे खेळ शेजाऱ्यांना सोबत घेऊन खेळू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा तेलंगाणा पोलिसांनी दिला आहे.
सुर्यापेठ येथील घरगुती खेळ खेळताना एका महिलेकडून 31 जणांना कोरोना संसर्ग झाला होता. मालवाहतुकीचे वाहन चालवण्याऱ्या चालकाकडून ही अशाच प्रकारे संसर्ग झाल्याची घटना उघडकीस आली होती. यामुळे पोलिसांनी घरगुती खेळ खेळताना चार पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे.
समुहाने खेळले जाणारे घरगुती खेळ आणि मैदानी खेळ याकाळात धोकादायक ठरू शकतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो हे रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्याने पालन करावे, असे रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचा कॅरमच्या सोंगट्या, पत्ते यांना स्पर्श झाल्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. कुटुंबातील व्यक्ती सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन घरगुती खेळांचा आनंद घेऊ शकतात. मात्र, शेजाऱ्यांना सोबत घेऊन असे खेळ खेळणे धोकादायक आहे. आम्ही यामुळे निर्माण होणाऱ्या संकटाची जाणीव अपार्टमेंटच्या प्रमुखांना करुन दिली आहे, असे महेश भागवत यांनी म्हटले आहे.