हैदराबाद - पशुवैद्य तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन जीवे मारण्याच्या आरोपाखाली चार तरुणांना अटक करण्यात आली होती. हे चारही आरोपी पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांचे शस्त्र हिसकावून आरोपी पळ काढत होते, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. आज या प्रकरणावर हैदराबाद उच्च न्यायालयात सुनावणी आहे.
६ डिसेंबरच्या पहाटे आरोपींना गुन्ह्याची पुनर्रचना करण्यासाठी घटनास्थळावर नेण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांची शस्त्रे घेऊन पळ काढला. त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच, दगड आणि काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला आणि यात चौघांचाही मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. चारही मृतदेह आज संध्याकाळी ८ वाजेपर्यंत जतन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
पोलिसांनी चकमकीचे एन्काऊंटरचे कारण दिले आहे. मात्र, अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. अशा प्रकार न्यायालयाला बाजुला सारून आरोपींना संपवणे हा न्यायबाह्य खून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्काळ निकालाच्या या प्रकारमुळे देशात चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.