हैदराबाद - तेलंगाणाच्या राज्य आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनाच्या दहा टक्के रक्कम बोनस म्हणून मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी ते रुग्णालयाचे अधीक्षक या सर्वांना मी सलाम ठोकतो! असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली. राज्य सरकारने याआधीच हे जाहीर केले आहे, की राज्याच्या पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आणि प्रोस्ताहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
यासोबतच, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ७,५०० रुपयांचे तसेच, हैदराबाद मेट्रो वॉटर सप्लायच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच, राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये त्यांच्या श्रेणीनुसार कपात होणार आहे.
दरम्यान, केसीआर यांनी १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याबाबत सुचवले आहे.
हेही वाचा : कोरोना इफेक्ट : व्यास नदीचे प्रदुषण घटले