चेन्रई - जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 200 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसह राज्यांनीदेखील कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडू सरकारने कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्याची सीमा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. फक्त अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्यास राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
कोरोनाचा प्रसार भारतामध्ये 'सेकंड स्टेज' म्हणजेच दुसऱ्या स्तरावर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 3 आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वांत जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर देशामध्ये 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 भारतीय आणि एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रभाव पाहता देशातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.