चेन्नई - कोरोना संसर्गामुळे देश सर्वात मोठ्या संचारबंदीला सामोरा जात आहे. त्यामुळे या संचारबंदीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावून उपासमारीचा सामना करावा लागत आहे. संचारबंदीचा सामना चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. त्यामुळे तामीळ चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक उपासमार होत असलेल्या आणि नोकरी गमावलेले नागरिक, टेक्निशियन, सहायक दिग्दर्शक यांच्यासह गरीबांना भोजन पोहोचवत आहेत. महेंद्र वर्मा असे त्या मदतीचा हात देणाऱ्या दिग्दर्शकाचे नाव आहे.
चेन्नईमधील सालीग्राम येथे वर्मा आपल्या पत्नीसह आपल्या पाच सहकाऱ्यांसह सकाळी अकरा वाजतेपर्यंत २०० भोजनाचे पार्सल घरी बनवतात. त्यानंतर ते पार्सल दुचाकीवर गरजूंना पोहोचवतात. चित्रपटसृष्टीत नोकरी सुरू केल्यानंतर मला अनेक अडचणीचा सामना करावा लागल्याने मला परिस्थितीची जाणीव असल्याचे वर्मा यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे कोरोनाचा फटका बसलेल्या व आर्थिक दुर्बलांवर काय वेळ येते हे मला चांगलेच अवगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मी गरजू नागरिकांना मदत करण्याचे ठरवले असेही ते म्हणाले. महेंद्र वर्मा हे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.