मुंबई - भारताची चीनसोबत सुरू असलेली चर्चा ही सकारात्मकरित्या पुढे जात असून, आपण ती सुरू ठेवणार असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल जन-संवाद रॅलीमध्ये ते बोलत होते.
भारत-चीन सीमा प्रश्नामध्ये भारताला मान खाली घालायला लावेल, असा कोणताही निर्णय मोदी सरकार घेणार नाही, असेही सिंह यांनी यावेळी सांगितले. हा सीमाप्रश्न बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे, आणि आम्हाला तो लवकरात लवकर सोडवायचा आहे. यासाठी चीनसोबत लष्करी आणि मुत्सद्दी चर्चा सुरू आहे. यासंबंधी सहा जून रोजी झालेली चर्चा ही सकारात्मक होती, आणि दोन्ही देशांनी याबाबत बोलणी सुरू ठेवण्याचे निश्चित केले असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काही विरोधी पक्षनेत्यांनी भारत-चीन सीमेवर काय सुरू आहे याबाबत स्पष्टीकरण मागितले होते, त्यांना मी सांगू इच्छितो की देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी जनतेची दिशाभूल करणार नाही. मला जे सांगायचे आहे, ते मी संसदेमध्ये सांगेल, असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा : 'महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे की सर्कस सुरू आहे?'