नवी दिल्ली – गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मेघालयला बदली करण्यात आल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपला चिमटा घेतला आहे. राज्यपाल बदलीचे निकष पश्चिम बंगालमध्ये का लावण्यात येत नाही, असा प्रश्न सिंघवी यांनी उपस्थित केला.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपची सत्ता असलेल्या गोवा सरकावर सौम्य टीका केली होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. सिंघवी यांनी ट्विटमध्ये म्हटले, की सरकावर टीका केल्याने भाजप, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने दुसऱ्यांदा मलिक यांची बदली केली आहे. हेच निकष भाजपची सत्ता नसलेल्या पश्चिम बंगालमध्ये लावण्यात येत नाहीत.
पश्चिम बंगालचे राज्यपालांचे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी अनेकदा मतभेद झाले आहेत. मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर त्यांची गोव्याचे राज्यापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गोव्याच्या राज्यपालाची 10 महिने जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले आहेत.
बदलीनंतर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की गोव्यात 10 महिन्यात राज्यपाल म्हणून काम करणे हा आनंददायी अनुभव होता. त्यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मेघालयच्या राज्यपालपदी तथागत रॉय यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत, तर गोव्याच्या राज्यपालाचा अतिरिक्त पदभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याकडे असणार आहे.