नवी दिल्ली - आम्हाला नवीन म्हणून खूप मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले आहे. म्हणून आमचा अधिकार आमच्याकडून न हिसकावता आमचा पूर्ण पगार घ्या. मात्र, आमचा निधी द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. कोरोनाच्या या कालावधीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले.
सोमवारी लोकसभेत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेत सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी खासदारांच्या पगारात एका वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याची तरतूद आहे. याबद्दल आज (मंगळवारी) खासदार नवनीत राणा यांनी ही मागणी केली.
त्या म्हणाल्या, निदान आमच्यासारख्या नवीन खासदांवर तरी अन्याय करु नका. जनतेने मोठ्या अपेक्षेने आम्हांला निवडून दिले आहे. एका मंत्र्यांना मी एका मुलाखतीमध्ये ऐकले की, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात १० हजार कोटींची कामे केली. मग आम्हांला वर्षाला ५ कोटी मिळतात. निदान ते तरी आमच्याकडून नका हिसकावू. आमच्यापेक्षा आमच्या मतदारसंघातील लोकांचा यावर जास्त अधिकार आहे. म्हणून गरजेच्या वेळी जर तो पैसा त्यांच्या कामी नाही आला तर काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमचा पूर्ण पगार घ्या. मात्र, निधी द्या अशी मागणी केली.