नवी दिल्ली - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने धडाडीच्या नेत्या हरपल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
'स्वराज' नावामागची कहाणी -
सुषमा स्वराज हे नाव सर्वपरिचित आहेच. पण, अनेकांना 'स्वराज' हे त्यांचे आडनाव असल्याची माहिती आहे, तर तसे नसून स्वराज हे सुषमा स्वराज यांच्या पतीचे नाव आहे. 'स्वराज कौशल' असे त्यांच्या पतीचे नाव आहे. त्यामुळे सुषमा या त्यांच्या पतीचे नाव आपल्या नावासोबत जोडत असत. 13 जुलै 1975 रोजी सुषमा स्वराज या स्वराज कौशल यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या होत्या.
कोण आहेत स्वराज कौशल -
स्वराज कौशल यांचा जन्म 12 जुलै 1952 रोजी झाला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वकील पेशातून सुरु केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयातदेखील त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यानंतर 1990 ते 1993 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी मिझोरामच्या राज्यपाल पदाची सुत्रेही सांभाळली आहेत. तसेच त्यांनी 1998 ते 2004 पर्यंत हरियाणा विकास पार्टीकडून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे 2000 ते 2004 मध्ये सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल हे दोघेही राज्यसभेचे सदस्य होते.