नवी दिल्ली - चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणुची झळ आपल्या नागरिकांना बसू नये, यासाठी विषाणूवर अचूक उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अद्याप संशोधन करत आहेत. यातच अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी एक अजबच विधान केले आहे. ' मांसाहार करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी कोरोना या विषाणूने जन्म घेतला आहे. त्यामुळे आता चीनने कोरोना विषाणूची मूर्ती स्थापन करून पुन्हा मासांहार करणार नाही, अशी शपथ घ्यावी', असा अजब सल्ला चक्रपानी यांनी शी जिंगपींग यांना दिला आहे.
कोरोना हा विषाणू एक अवतार आहे. प्राणी आणि जीव-जंतुना वाचवण्यासाठी या विषाणूने जमिनीवर अवतरला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांनी करोनाची मूर्ती उभारून कोरोना विषाणूची माफी मागावी. तसेच पुन्हा मासांहार करणार नाही आणि कोणत्याही निर्दोष जिवांना त्रास देणार नाही, अशी शपथ घ्यावी. त्यानंतरच कोरोना विषाणूचा प्रकोप कमी होईल, असे चक्रपानी म्हणाले आहेत.
यापूर्वीदेखील चक्रपाणी यांनी या विषाणूवर उपाचार करण्यासाठी अजब दावा केला होता. कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेला एखाद्या रुग्णांच्या शरीरावर गाईचा शेण लावला आणि 'ओम नम: शिवाय' हा जप केला तर त्याचे प्राण वाचतील, असा दावा स्वामी चक्रपाणी महाराजांनी केला होता.
डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.