नवी दिल्ली - दिल्लीच्या बवाना भागामध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर 'कोरोना पसरवण्याचे' आरोप करण्यात आले होते.
मेहबूब अली असे या तरुणाचे नाव आहे. तो बवानामधील हारेवाली गावात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली नुकताच भोपाळवरून परतला होता. तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमासाठी तो भोपाळला गेला होता. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर एका भाज्यांच्या ट्रकमधून तो दिल्लीला परतला होता.
त्यावेळी आझादपूर भाजीमंडईमधून त्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून, त्याला कोरोना नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले. आपल्या गावात पोहोचल्यानंतर मात्र, त्याला कोरोना झाला असून, गावात कोरोना पसरवण्यासाठी तो परतला असल्याच्या अफवा पसरू लागल्या. यामधूनच काही लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे, तसेच तीन आरोपींना अटकही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा : घरातून पळून गेले प्रेमी जोडपे; लॉकडाऊनचा आदेश मोडल्यामुळे गुन्हा दाखल..