पटना - बॉलिवूड व टीव्ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. सुशांतच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याच्या मामाने त्याने आत्महत्या केल्याचे नाकारले आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद असून त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
ही खुनाची घटना आहे. बिहारमधील तरुणा आणि राजपूत महासभेचेही हेच म्हणणे आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, असे सुशांत सिंह राजपूतचे मामा आर सी सिंग यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी त्याची व्यवस्थापक दिशा सॅलियनने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणातही पोलीस आणि प्रशासनाचा सुशांतवर दबाव होता, असेही सुशांतचे मामा म्हणाले.
आस सी सिंग यांनी सुशांतच्या काही आठवणींना उजाळा दिला. "तो म्हणायचा की, त्याला शिखरावर पोहोचायचे आहे. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील'. कधी कधी त्याने अठरा-अठरा तास काम केले आहे. एकदा माधुरी दीक्षितसमवेत असलेल्या एका नृत्य कार्यक्रमाचा सुशांत सदस्य होता. त्यावेळी त्याच्या पाठिला दुखापत झाली होती मात्र, त्यांने माघार घेतली नव्हती. तो जिद्दी होता त्यामुळे तो आत्महत्येसारखे पाऊल उचलेल याबाबत शंका आहे.
वांद्रे पोलिसांना त्याच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. प्राथमिक तपासणीच्या आधारे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अवालाची प्रतिक्षा केली जात आहे.