नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातून गुजरात राज्याचे कायदामंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा यांना दिलासा मिळाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने, गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपावरून ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवत चुडासामा यांची आमदारकी रद्द केली. यावर चुडासामा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण -
२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून भूपेंद्रसिंह चुडासामा हे भाजपाचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून आश्विन राठोड हे रिंगणात होते. या निवडणुकीत चुडासामा यांनी राठोड यांचा ३२७ मतांनी पराभव करत विजय संपादन केला होता. निकालानंतर आश्विन राठोड यांनी मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
गुजरात उच्च न्यायालयाने 12 मे रोजी या प्रकरणाचा निकाल सुनावताना ढोलका मतदारसंघातील निवडणूक रद्द केली होती. यामुळे चुडासामा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय देताना या प्रकरणी स्थगिती दिली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर स्थलांतरितांकडून पोलिसांवर दगडफेक
हेही वाचा - शोभन सरकार यांच्या अंत्यसंस्कारावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा