अहमदाबाद - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील अनेक भागात आंदोलने झाली. काही राज्यांमध्ये अजूनही आंदोलने सुरू आहेत. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज होण्याच्या घटन घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी मत व्यक्त केले आहे. भिन्न विचाराच्या लोकांना देशविरोधी म्हणणे म्हणजे लोकशाहीच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे ते म्हणाले.
लोकांच्या विचारांना दाबून टाकणे म्हणजे देशाच्या आंतरआत्म्याला दडपल्यासारखे आहे. असहमती म्हणजे लोकशाहीची 'सेफ्टी वॉल्व' आहे. लोकांचे भिन्न विचार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी तंत्राचा वापर केल्यामुळे लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण होते. विचारांमधील भिन्नतेला लोकशाही आणि राष्ट्र विरोधी म्हणणे चुकीचे आहे. यामुळे संविधानिक मुल्यांना धक्का पोहचतो, असे चंद्रचूड म्हणाले.
प्रश्न विचारणे आणि विरोधी मत व्यक्त करण्यास अडवल्यामुळे समाजाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मुल्यांना धक्का पोहोचतो. त्यादृष्टीने लोकशाही सेफ्टी वॉल्व आहे. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधणे आणणाऱ्या आणि भीतीची भावना निर्माण करणाऱ्या प्रयत्नांना सरकारने हाणून पाडले पाहिजे, असे ते म्हणाले.