कन्नूर - केरळातील थलास्सरी येथील सुचेता सतीश ही १३ वर्षीय मुलगी एक, दोन किंवा तीन नव्हे तर, तब्बल ११६ भाषांमध्ये गाणी गाते. सुचेताच्या नावावर ६ तासांमध्ये ११२ विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा जागतिक विक्रम आहे. सुचेता सध्या दुबई इंडियन हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. तिचे वडील सतीश डॉक्टर आहेत तर, आई सुनिता गृहिणी आहे.
सुचेताला विविध भाषांबद्दल उत्सुकता होती. सुचेताने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून गाणी म्हणण्यास सुरुवात केली. सुचेता सुरुवातीला जपानी भाषेत गाणे गायला शिकली. यानंतर, आई-वडील, मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांनीही तिला इतर भाषांमध्ये गाणी म्हणण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने इतर भाषेत गाणे म्हणायला सुरुवात केली. आता ती एक-दोन नाहीतर तब्बल ११६ भाषांमध्ये गाणी म्हणत आहे.
दुबईत २ वर्षांपूर्वी म्युझिक बियॉण्ड बाउंडरिज या कार्यक्रमात सुचेताने जागतिक विक्रम केला. तिने कार्यक्रमात १०२ भाषेत गाणी गायली. यामध्ये २६ भारतीय भाषा आणि ७६ विदेशी भाषांचा समावेश होता. तिने गाण्यांचे अल्बमही केले आहेत. या अल्बमद्वारे तिने ५ लाखांची कमाई केली. ही सर्व कमाई तिने केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली. अवघ्या १३ वर्षाच्या सुचेताला पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गाण्याचीही संधी मिळाली होती. याला ती आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धता मानते. आता ११६ भाषांमध्ये गाणी म्हटल्यानंतरही सुचेता अजून थांबलेली नाही. ती जगातील अजूनही विविध भाषांमधील गाणी शिकत आहे.