लखनऊ - तुम्ही कधी विचार तरी केला आहे का? एक हातगाडीवर विक्री करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न किती असेल. अलीगढमधे हातगाडीवर कचोरी विक्री करणाऱ्याचे उत्पन्न तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल. या हातगाडीवर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. तेव्हा या दुकानदाराचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी ६० लाख असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर हे उत्पन्न कोटींच्या घरातही असण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अलिगढ मधील सिमा सिनेमा गृहाजवळ मुकेश चौडाल याचा १० ते १२ वर्षांपासून कचोरी आणि समोसे विक्रीचा गाडा आहे. प्रमाणापेक्षा जास्त उत्पन्नामुळे या दुकानदाराच्या उत्पादन शुल्क विभागाकडे (स्टेट इंटेलिजन्स ब्युरोकडे) अनेक तक्रारी दाखल्या होत्या. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाबाहेर राहून दोन दिवस हेरेगिरी करत विक्रीचा अंदाज घेतला. त्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरु केली. कचोरी विक्रेत्याने लाखांमध्ये होणाऱ्या उत्पन्नाबद्दल कबूली दिली आहे. मात्र, त्यामागे खर्चही तेवढाच जास्त असल्याचे सांगितले आहे.
४० लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विक्रेत्याला जीएसटी कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु, या कचोरी विक्रेत्याने जीएसटी कार्यालयात नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या विक्रेत्याची आता चौकशी सुरु आहे. तयार मालावर ५ टक्के जीएसटी लावला जातो. मात्र, मागच्या १२ वर्षात या व्यापाऱ्याने काडीमात्र कर भरला नाही. या घटनेनंतर अलिगढमधील अनेक छोटे विक्रेते उत्पादन शुल्क विभागाच्या निशान्यावर आले आहेत.
काही दुकानदारांची विक्री प्रमाणापेक्षा अधिक आहे. मात्र हे विक्रेते जीएसटी नोंदणी करुन घेत नाहीत. गुप्त स्वरुपात मिळालेल्या माहितीनंतर आम्ही कचोरी विक्रेत्यावर कारवाई केली. ज्या विक्रेत्यांना कर मुक्त मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे, त्यांनी जीएसटी नोंदणी करावी. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, असे अनूप माहेश्वरी, एडिशनल कमिश्नर, वाणिज्यकर विभाग यांनी सांगितले.