चेन्नई - आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्त ईटीव्ही भारतने 2020 साठी पद्म पुस्काराने गौरवलेल्या महिलांच्या संघर्षाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तमिळनाडूतील कृष्णाम्मल जगन्नाथन या चिरतरुण समाजसेविकेच्या संघर्षाची कहाणी आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णाम्मल जगन्नाथन यांना समाजसेवेसाठी पद्म पुरस्कार मिळाला आहे.
16 जून 1926 ला जन्म झालेल्या कृष्णाम्मल जगन्नाथन यांचे आयुष्य लहानपणापासूनच संघर्षमय राहिले आहे. त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मदुराई येथील अमेरिकन महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गांधीवादी विचारांवर चालणाऱ्या कृष्णाम्मल यांनी पती शंकरलिंगम जगन्नाथ यांच्या सोबत मिळून समाजातील गरीब, भूमीहीन लोकांसाठी त्यांनी संघर्ष केला.
हेही वाचा - महिला दिन विशेष : जाणून घ्या फुटबॉलची 'दुर्गा' ओयनुम बेंबीम देवी यांच्याविषयी...
कृष्णाम्मल यांनी महिलांसाठी देखील काम केले आहे. 1968 मध्ये नागई जिल्ह्यातील कीज वेनमनी गावात 44 महिलांना धान्याच्या रुपात मजूरी मागितल्यामुळे जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेने कृष्णाम्मल यांच्या मनावर खोल परिणाम केला. त्यानंतर त्यांनी महिलांसाठी देखील काम करण्यास सुरुवात केली.
कृष्णाम्मल स्वत: अनेकदा महिलांसोबत तुरुंगात गेल्या आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांसारख्या अनेक नेते आणि समाजसेवकांचे आभारही मानले आहेत. करुणानिधींनी कृष्णाम्मल यांना गरीब लोकांसाठी काम करण्यास मदत केली होती. भूदान चळवळीचे उद्गाते विनोबा भावे यांच्या सोबत त्यांचे घनिष्ठ संबध होते.
अतिवृष्टी आणि पुरामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी 5 हजार घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट कृष्णाम्मल यांनी ठेवले आहे. सरकारने या कामासाठी मदत केली तर लवकरात लवकर बेघर लोकांना निवारा मिळेल, असे कृष्णाम्मल यांनी सांगितले.
आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचणाऱ्या कृष्णाम्मल यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. 2008 मध्ये त्यांना राईट लाईव्हलीहुड पुरस्कार आणि 2020 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. दुर्दम्य इच्छा शक्ती असणाऱ्या कृष्णाम्मल यांना ईटीव्ही भारतचा सलाम.