सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बालेंगटोंगच्या जंगलात एका पहाडाजवळ सुरक्षा दलाच्या १४० जवानांच्या एक चमूने माओवादी शिबिराला घेरले. या जवानांनी 29 जुलैला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या जवानांनी रात्रभर हे ऑपरेशन चालवले.
ही संपूर्ण कहाणी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी वेट्टी रामा आणि नक्षलवादी संगठनेशी संबंधित असलेल्या वेट्टी कन्नीची. आत्मसमर्पण केल्यानंतर वेट्टी रामा गोपनीय सैनिकाचे काम करत आहे.
एसपी शलभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय कन्नी आणि 43 वर्षीय रामा हे बहीण-भाऊ आहेत. 29 जुलैला बालेंगटोंगच्या जंगलात नक्सलवादी नेता वेट्टी कन्नीच्या गटासोबत पोलिसांची चकमक उडाली. वेट्टी कन्नीच्या सुरक्षारक्षकांनी पोलिस जवानांवर गोळीबार करायला सुरुवात केली. पोलिसांच्या या चमूत वेट्टी कन्नीचा भाऊ वेट्टी रामादेखील सामील होता. या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, कन्नी पळून जाण्यात यशस्वी झाली.