नवी दिल्ली - रशियन बनावटीच्या स्पुटनिक -५ या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यास भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. भारतीय कंपनी डॉ. रेड्डी ही या लसीची भारतातील चाचण्या घेणार आहे. कोरोनाने आत्तापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला असून अनेक देशांतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जग कोरोना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे.
भारतात कोरोना लसीचे उत्पादन करुन चाचण्या घेण्यासाठी रशियाने आणि डॉ. रेड्डी फार्मास्युटिक कंपनीने १६ सप्टेंबरला सहकार्य करार केला आहे. 'ही खूप महत्त्वाची घडामोड असून त्यामुळे भारतात आता क्लिनिकल चाचण्या घेता येणार आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्याासाठी सुरक्षित आणि कार्यक्षम लस आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत', असे डॉ. रेड्डी कंपनीचे सह-संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही. प्रसाद म्हणाले.
सर्व परवाने मिळाल्याने देशात आता लसीच्या चाचण्या सुरू करता येतील. स्पुटनिक लस ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सुरक्षित आढळून आली असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. स्पुटनिक लसीचे व्यवस्थापन 'रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड' ही संस्था पाहत असून २०२० वर्षाच्या शेवटी लसीचा पुरवठा भारताला होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. मात्र, त्याआधी यशस्वी चाचण्या आणि सर्व नियम अटींची पूर्तता होणे अनिवार्य असल्याचे रशियाने म्हटले आहे.