नवी दिल्ली - नाशवंत खाद्यपदार्थ आणि बियाण्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांची सोय करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लॉकडाऊनदरम्यानही हे पदार्थ देशभरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध रहावेत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
देशाच्या कृषी मंत्रालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली. देशातील ६७ रेल्वे मार्गांवर अशा १३४ विशेष गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. यांमधून फळे, भाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच बियाण्यांचीही वाहतूक करणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.
ज्या भागांमध्ये कमी प्रमाणात मागणी आहे, अशा भागांमध्येही या गाड्या जातील जेणेकरुन देशातील कोणत्याही भाग या सेवेपासून वंचित राहणार नाही. जितक्या जास्त जागा शक्य आहेत, तेवढ्या जागांवरती हे सामान पोहोचवण्याचे निर्देश या गाड्यांना देण्यात आले आहेत. तसेच गरजेनुसार गाड्यांचे थांबेही वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे.
विशेष गाड्यांच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या फलोत्पादनाच्या सचिव व मिशन संचालकांसह व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच, रेल्वेद्वारे चालविल्या जाणाऱ्या या गाड्यांचा लाभ घेण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करण्याची त्यांना विनंती करण्यात आली", असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : VIDEO : बेघर व्यक्तीने दाखवून दिले 'सोशल डिस्टन्सिंग'चे महत्त्व; बंगल्यातील लोकांना कधी येणार अक्कल?